Tuesday, August 28, 2012

फुलपाखरीकरण


सगळ्या महाराष्ट्रात हुलकावणी देणारा पाऊस गडचिरोलीत मात्र मनसोक्त पडत आहे. वाहणाऱ्या नद्या नाले, पाण्याने तुंबलेली भाताची शेते, पक्षाची गाणी, हिरवीगार झाडे, ओल्या रानवाटा... सगळं कसं मनाची जळमटं दूर करणारं. गार चिखलामध्ये पाया ठेवताना किती छान वाटतं! मग जमिनीचा स्पर्श व्हावा म्हणून पायातलं खेटर त्यागणारा वेंकी आठवतो. तो हसतोच माझ्या पायातली चप्पल पाहून.

अशातच आमच्या ऑफिसच्या मागे अळ्यांचा सुळसुळाट सुरु झाला. मग त्यांना खायला कावळे येऊ लागली. कावळ्यांपासून वाचलेल्या अळ्या स्वतःला एका अंधार कोठडीत कोंडून घेत. आत काय व्हायचं कुणास ठाऊक? मग एक दिवस ती अंधार कोठडी तोडून कुणीतरी भलतंच बाहेर यायचं! सुरवंटाचं फुलपाखरू झालेलं असायचं.

17 जुलै 2012 ला मला सर्चमधे येऊन दोन वर्ष पुर्ण झाली. जीवनाचा स्पर्ष व्हावा म्हणून पायातली चप्पल काढण्याचा थोडाफार मी प्रयत्न करत आहे. त्यात माझंही काही अंशी फुलपाखरीकरण झालं असावं...

काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हेच इंजिनियरींग शिकवते असं मला वाटतं. तेवढं मीही शिकलो. कॉर्पोरेट क्षेत्रात जायचं नाही हा निर्णय त्यातूनच आला. पण काय करायचं? याच शोधात शोधग्राम सापडलं. डॉ. अभय आणि राणी बंग यांनी आदिवासींच्या सेवेसाठी गडचिरोली येथे 1986 साली सर्च नावाची संस्था सुरू केली. शोधग्राम ही सर्चमधे काम करणार्‍या लोकांची वसाहत. या संस्थेसाठी आम्ही (मी आणि माझा मित्र अश्विन) सॉफ्टवेअर बनवितो.

आपल्या आयुष्यातील खुप मोलाची वर्षे आपण पारंपारिक शिक्षणासाठी देतो. तेव्हा आपण अभ्यास करावा हेच अपेक्षित असतं आणि जेव्हा शिक्षण संपतं तेव्हा तुम्ही जबाबदार होता! मग सुरू होतं खर्‍या आयुष्यातीला आव्हानांना सामोरं जाणं. जीवन आणि शिक्षण यात द्वैत आहे हेच आपण सर्व व्यवस्थेतून सांगत असतो. पण हे खरं आहे का? शिक्षणाचं प्रयोजन काय असावं? विनोबा म्हणत, ‘जीवन आणि शिक्षण हे अद्वैत आहे. आपण जीवनाच्या आसपास शिक्षण उभे केले पाहिजे.’.

गांधीजींनी मांडलेली नयी तालीम ही शिक्षणपद्धती याच तत्वावर आधारलेली आहे आणि हाच सर्चच्या कामाचा गाभा आहे.

पहिल्या दिवसापासूनच आमची तालीम सुरू झाली. एका मोठ्या नवीन सॉफ्टवेअर प्रोजेक्टची आम्हा नवख्यांना जबाबदारी देण्यात आली. नवनवीन शिकण्याची, आपणच शोधण्याची मजा काय असते हे शब्दात मांडणं कठीण. सोफ़्टवेअरच्या क्षेत्रात असणारा अमुर्तपणा येथे नव्हता. वापरकर्त्यांच्या गरजांपासून ते प्रशिक्षणापर्यंत सगळं काही आम्हा दोघांनाच करायचं होतं. आपल्याच डोळ्यासमोर एखादं बाळ जन्मावं, त्याच्यावर संस्कार व्हावे तसं त्या प्रोजेक्टचं झालं. आम्ही केलेलं सर्व काम software designing च्या मार्गदर्शक तत्वांनुसारच होतं असं माझं मुळीच मत नाही पण लोकांची गरज पुर्ण झाली हे मात्र खरं. आपण बनवलेलं सॉफ्टवेअर लोकांच्या दैनंदिन वापराचा भाग होणं, त्याचा त्यांना फायदा होणं ह्याचं समाधान खुप मोठं असतं. आमचं शिक्षणही झालं. खर्‍याखुर्‍या जीवनातली खरीखुरी समस्या हातात घेतली तर शिक्षण आपसुखच घडून जातं.

अम्मा (डॉ. राणी बंग) नेहमी म्हणतात life cannot be compartmentalized. आपलं आयुष्य कप्प्यांमधे नसतं, ते
एकसंध असतं. मग आपलं काम सुद्धा तसं नसावं. त्यामुळेच मी जमेल तसं mHealth, मानसशास्त्र, तारूण्यभान, व्यसनमुक्ती, संशोधन, विश्लेषण, आरोग्य शिक्षण यांसारख्या विविध गोष्टींमधे सहभाग घेतला, शिकलो.

नायना एकदा म्हणाले होते, तुमचा ‘स्व’ हा प्रकाशासारखा असतो. प्रकाश जसा एखाद्यागोष्टीवर पडेपर्यंत त्याचं अस्तित्व जाणवत नाही तसंच एखाद्या प्रश्नाला भिडेपर्यंत स्वतःच अस्तित्व कळत नाही.’ गडचिरोलीमधील भागात लहान मुलांच्या पोषणाची स्थिती पाहण्याचा एक अभ्यास आम्ही केला. ह्या अभ्यासातून संशोधन पद्धती, विश्लेषण हे तर मी शिकलोच पण मला लहान मुलांसोबत काम करायला आवडतं ही महत्वाची गोष्ट कळाली. निसर्ग, मानसशास्त्र, कला, रिसर्च, शिक्षण ह्यातील माझा रस मला सर्चमधील वातावणामुळे उमगत गेला. हळूहळू माझा ‘स्व’ दिसू लागला.

सर्चमधील लोक ही सर्चची पुण्याई आहे आणि त्यांच्यासोबत वास्तव्य करणं ही शोधग्राममधे असण्याची विशेषता. शोधग्रामच्या द्वारावर असणार्‍या रेमाजीभाऊंपासून ते शेवटी असणार्‍या शेतातील सदूभाऊंपर्यंत सगळे आपल्या कामातून काही तत्वज्ञान सांगत असतात. येथील प्रत्येक इमारत बोलते आपल्याशी. पिंपळ भवनात बसल्यावर नकळत बुद्ध झाल्यासारखं वाटतं. प्रार्थना, अभंग, नायनांचं (डॉ अभय बंग) मार्गदर्शन यांमुळे संध्याकाळ शांत पवित्र होउन जाते. पानावर पडणार्‍या थेंबाचाही आवाज यावा, प्रत्येक हळूवार गोष्ट जगता यावी इतकं जीवंत मन होतं.

सर्चमधे येण्याच्या काही वर्षांपुर्वी समाजातील काही गोष्टींवर चिडून, थोडा हताश होऊन एक निर्णय मी केला होता. ‘काहिही झालं तरी माझी गेंड्याची कातडी होऊ द्यायची नाही!’. बाहेरच्या जगाने कितीही प्रयत्न केले तरी तरूणांनी असंवेदनशील राहून चालणार नाही हे मला पटलं होतं.

गेल्या दोन वर्षाचं सिंहावलोकन करताना माझं फुलपाखरीकरण झालं किंवा नाही ह्याबद्दल कदाचित मी सांगू शकणार नाही पण संवेदनशीलता मात्र नक्कीच जपल्या गेली. माझ्यासारख्याच इतर तरूणांना कुठेतरी 'स्व' चा शोध असावा... त्यांना माझ्यासारखं शोधग्राम मिळेल का ?