Monday, September 3, 2012
आश्रमशाळा
निबीड जंगलातून हिरवं मन घेऊन
एका दारावर पोहचलो
”कुत्र्यांपासून सावधान”ची पाटी
काढून फेकली होती कुणीतरी
घाबरत भेदरत आत शिरलो
रंगबेरंगी फुलं
त्यांच्या फक्त असण्यानेच
फुलवत होती ओऍसिस
रेताड जमिनीत
दुर गवतामधे कोपर्यात
हापस्याची हंबरडाफोड चालू होती
“माझ्या पाण्यात फुलांचे रंग तर निघून जाणार नाही ना?”
ओक्साबोक्सी रडणार्या छताखाली
अर्धनग्न लाचार भिंतीमध्ये
ओरबाडलेल्या भुईवर
गिळंकृत होत होतं संरक्षित बालपण
घंटा वाजली
कैद्यांची जेवणाची वेळ झाली
वापरात नसलेल्या संडासासमोर
चिखलात उभ्या कैद्यांना
भात भाजी मिळाली
एकानं भाजी निवडून जमिनीवर ठेवली,
आवडत नसेल त्याला कदाचित
सदैव लाळ गाळणार्या कुत्र्यानेही
तेव्हा हुंगून
भाजी खाण्यास नकार दिला
Subscribe to:
Posts (Atom)