Wednesday, March 11, 2026

आऊटलायर्स

 मानवाची प्रत्येक पिढी म्हणे

काही महान व्यक्तींच्या खांद्यावर बसलेली असते.

खरंच आहे की...


आपल्याला असंख्य गोष्टी आपसुखच मिळाल्या

अन्न वस्त्र निवारा या गरजा आपल्या

इतिहासात विविध रुपात आल्या

आणि नंतर गरजा वाढत गेल्या

गरजा भागवण्यासाठी मग मानवाने ज्ञानाची निर्मिती केली

ज्ञाननिर्मिती ही पण गरज झाली मग…

गरजा वाढत राहणं ही पण कुणाचीतरी गरजच असेल ना

वाढोत गरजा… अमर्याद…

आपल्याला आपल्या महान पूर्वजांनी खांद्यावर बसवलंच आहे की

मग अजून पुढचं पाहीलं तर बिघडतं कुठे?

हेच तर प्राग्रेसिव्ह असणं आहे ना!


पण मग का माझ्या मनात घालमेल असते

वाटतं, विकासामधे बहुजनांचा विचार नाही

एका साच्यात न बसणाऱ्या

नॉर्मल नसणाऱ्या

माणसांचा विचार नाही

मग वाटतं, ही लोक नाहीत बसली का कुणाच्या खांद्यावर?

“अरे त्यांना सरकारने सगळं फुकट दिलंय.

कुबड्यांची सवय झालीये त्यांना”

हा युक्तीवाद सुरु होतो.

पण फुकट मिळण्याचं खातं सुरुवातीपासून पाहायला हवं ना….

मग कळेल कुणाची ठेव किती आहे ते, व्याज किती आहे ते

नको नको… त्यापेक्षा खांद्यावरून विकासाचं हरिण पाहू या…

मी पण मग खांद्यावर बसतो

पुढ पाहायला… 

तेव्हा चुकुन खाली नजर जाते

मला अंधारात चमकणारे शेकडो डोळे दिसतात

Sunday, February 4, 2018

...ism



I tried to help them
And they make me one of them
I tried to criticise them
And they make me their opponent
I continued the criticism
And they killed me
I killed myself
I am the killer
I am the killed
I am You
You are Me

Thursday, January 12, 2017

वाट

रस्त्याच्या बाजूला
गाडी पार्क करून
मी तुझी वाट पाहतोय
पार्किंग लाईट,
तू येण्यापूर्वीच
‘आली – आली – आली’
असं बोलतोय
अंधाऱ्या रात्री पास होणाऱ्या गाड्यांचा
मध्येच येणारा आवाज
भेटीची उत्कंठा अजून वाढवतोय
तेवढ्यात तुझा फोन...
“मला अजून थोडा वेळ लागेल”
पण माझं लक्ष...
फक्त पार्किंग लाईटकडेच आहे
‘आली – आली – आली’

(कसारा: डिसें २०१६)

Tuesday, April 21, 2015

कलरब्लाईंड

मला तिची खूप आठवण येतीये...
खूपच जास्त
कालच तिच्या नसण्याचा
झाला दुःखद साक्षात्कार
ते सत्य – देव करो तो आभास असो
तो आभास
बोचतोय मला
इतका जास्त पीडतोय की
धमन्यातून रक्त वाहायचं थांबून जावं
आपलं अस्तित्व हवेत वीरघळून जावं

तिच्या कुशीत सदैव रमणारा मी
माझ्या गाण्यात शब्द फुंकणारी ती
वेळेलाही बधीर करणारे आम्ही
कुठे आहोत?

चित्रातून एक एक रंग विरून जावा
आणि उरावा फक्त कोरा कागद
असे का व्हावे?
रोमांचित करणार्‍या श्वासा-श्वासात
फक्त अनरोमॅन्टिक ऑक्सीजन उरावा?
ती हरवलीये का?
ती हरवलीये... का मी?

कुणी तिचा पत्ता सांगेल का?
कुणी माझा पत्ता सांगेल का?

ती कशी होती?
अं... ती....
ती होती सत्यप्रिय
ती होती भावनिक
ती होती सुंदर शांत
ती होती बोल्ड परखड
दु:खी विद्रोही अस्तित्ववादी
शुन्य भोळी रांगडी
काहीशी वेडी सामाजिक खाजगी
रंगीत सुवासिक तालबद्ध
ती होती जगद्व्यापी ओम्नीप्रेजेंट
मुख्य म्हणजे
ती होती!
ती सर्व काही होती
ती मी होती
आणि मीही होतो ती

खरंच ती  हरवली असेल का?
कदाचित ती नसेल हरवली
कदाचित मीही शाबूत असेन
चित्रातले रंग अजूनही तसेच असतील
मीच झालो असेल
कलरब्लाईंड !

कदाचित...

Wednesday, August 27, 2014

ठाणे स्टेशन

बस येत आहेत. जात आहेत.
रेल्वेच्या अनाउंसमेन्ट होत आहेत.

एक माणूस.
पळत पळत कठड्यावरून उडी घेत.
एका बसच्या चाकातून निघून,
दुसरीच्या घशात.

एक साधारण वृद्ध स्त्री.
हाताला प्लास्टर, तोंडाला काही पट्ट्या,
नाकातून जाणारी नळी.
आणि सावलीसारखा मागाहून चालणारा मुलगा.
मोकळेपणे मॉर्निंग वॉक करत.

पळसाच्या फुलागत
सूर्याचं अस्तित्व.

एक बाई.
कडेवर बाळ, बाजूला पिशवीभर संसार.
सूर्याकडे
किंवा सूर्याच्या शुन्याकडे पाहात.

सूर्य ढगात!

सफ़ाई कामगारांच्या खराट्याचा
आणि
केरात सापडलेल्या,
रात्री मोकळ्या झालेल्या दारूच्या बाटल्यांचा
सिम्फनी!

प्लास्टीक उचलणारा,
केरातली बाटली साधून अदृश्य!

रस्ता धुवून साचलेल्या पाण्यावर
ताव मारणार कावळा.
कबूतराचा मात्र पोपट!

गर्दी वाढली!

कानात बोळे घातलेली,
असंख्य जमात,
काहीतरी ऐकण्यासाठी
किंवा काहीच
न ऐकण्यासाठी
सैरभैर.

ती सूर्याला दम देणारी बाई,
गर्दीतच बसते बाळाला पाजत.
तिचा नवरा,
कठड्यावर बसून जूना पेपर चाळत.

बस आली... गेली.
गर्दी अजून वाढली!

पुऩ्हा एक जण
बससाठी पळताना दिसला!!!