सर्चमधे
रहाणं म्हणजे एक अभूतपुर्व अनुभवच आहे. ईथे रोज काही तरी नवीन तुमच्या
स्वागताला उभं येउन ठाकतं. असाच एक नवा अनुभव नवीन वर्षाच्या पहिल्याच
आठवड्यात आम्हाला मिळाला. मंगळवार 4 जानेवारी 2011, एडसगोन्दी नावाच्या
गावाने, जे की फक्त 7-8 कुटुंबांचं गाव आहे मोठ्या हिमतीनं या वर्षीच्या
तरूणांच्या खेळाचा जिम्मा उचलला. ज्या काळात शेजारी एकमेकांचं तोंड पाहणं
पसंद करत नाही त्या काळात ह्या गावाला साथ देण्यासाठी घोडेजरी आणि कुपानेर
नावाची दोन गावं धावून आली. ह्या तीन गावांची मिळून कुटुम्बांची संख्या 50
च्या घरात असावी. आणि ईकडे एक नव्हे दोन नव्हे तब्बल 80 संघ खेळणार होते.
कदाचीत, आपल्या नेहमीच्या सुरक्षीत वातावरणात राहून ह्या सर्वांची भव्यता
आपल्याला कळणारही नाही. त्यासाठी ही गावेच पहायला हवी. मी ती पहिली, तेव्हा
मला कळालं कि हे एक नवीनच विश्व आहे आणि ह्यांच्या कडून शिकण्यासारखं बरच
काही आहे. अमृतने मला एकदा सांगीतले होते, ’मी ईथे काय घ्यायला आलो आहे
त्यापेक्षा मी ईथे काय देऊ शकतो ह्याचा विचार कर म्हणजे सबळ वाटेल...’ आणि तरिही मी स्वार्थी झालो! ती सगळी सुबत्ता पाहता डोम्बल्याचं सबळ वाटेल?
आमचा
एडसगोन्दीला जाण्याचा आणि तेथून परत येण्याचा रस्ता मुद्दाम वेगळा
ठरवण्यात आला होता. सम्पुर्णतः नैसर्गिक वस्तूंचा वापर करून वेगवेगळ्या
गावांनी केलेली सजावट आम्हा सगळ्यांना दिसावी ही त्या मागील प्रांजळ ईच्छा
होती. नेहमीच हे सगळं नैसर्गिक साधनांपासूनच साध्य केलं जातं पण ह्या वेळेस
सजावटीला एक कलात्मक मुलामा चढवलेला होता आणि त्यामुळे नायनांनी सुद्धा
उद्घाटनाला यावं हा सगळ्या आदिवसी लोकांचा आग्रह होता. नायनांना येणं भागच
होतं.
आदिवासी
गावात तुम्ही गेलात तर तुम्हाला पहिले दिसून येईल ते गावातील रीत-रिवाज
आणि निसर्गाचं सानिध्य. आम्ही सर्चमधून पुस्टोला पर्यंत डाम्बरी रस्त्याने
गेलो पण आम्ही वाट बघत होतो ते पुढील रस्त्याची, कारण, हा रस्ता कच्चा,
झाडातून, फान्द्यातून जाणारा होता. कोन्दावहीच्या थोडं पुढे गेल्यावर तर
पायवाटच दिसत होती आणि त्यावरून सायकलवर हत्ती बसावा तशी आमची टाटा सुमो
चालत होती. पुढे एका छोट्याशा पुलावर एका आदिवासी बाईला पाहून सुनन्दाताई
गाडीतून हात दाखवू लागल्या. ती सर्चची गावातील सुईण होती. मला हळूहळू
सर्चची व्याप्ती कळत होती. जवळपास प्रत्येक गावासोबत कार्यकर्त्यांचा अनुभव
जोडला होता.
थोड्या
वेळातच काही घरं दिसली आणि समोर आमचे तुषारभाऊ नेहमीच्याच हसमुख
मुद्रेमध्ये उभे होते. हे गाव म्हणजे घोडेजरी – एडसगोन्दीचं शेजार. अम्मा,
नायना, हिरामनजी ह्या सगळ्यांचं पहिलं स्वगत हे गाव करणार होतं.
त्यासाठी
त्यांनी हिरव्या आणि पिवळ्या रंगांचे बाम्बू वापरून फार सुरेख कमान उभारली
होती. गावकर्यांनी पाहुण्यांचं फार प्रेमानं स्वागत केलं. त्यानंतर
थोड्या वेळातच आम्ही धक्क्याला जाऊन पोहोचलो. तिथे अम्मा-नायनांची पुजा
आदिवासी भागातील अतिशय प्रतिष्ठीत असणार्या पुजार्याकडून पुजा करण्यात
आली. बहूतेक कार्यक्रमात लावला जातो तसा बिल्ला (badge) प्रत्येकाला
लावला. हा बॅच त्यांनी बाम्बूच्या सालीपासून बनवलेले अतिशय आकर्षक असे
छोट-छोटे शिल्प होते. काही हरणाचे,काही चष्म्याचे तर काही फुलं असं
त्यांच्या संस्कृतीचं, त्यंच्या दिनक्रमाचं दर्शन करणारे बॅच त्यांनी बनवले
होते. त्यानंतर त्यांनी फार सुंदर नृत्य सादर केलं. पुजार्याने घातलेला
टोप म्हणजेतर विविध पक्ष्यांच पिसाराच होता. आम्ही ज्या रस्त्यावरून चालत
होतो त्या रस्त्याच्या दुबाजूला ही आठ घरं टुमदार वाटत होती. रस्त्याच्या
दुतर्फा झाडांच्या सालीपासून तयार केलेले तोरण लावलेले होते. समोर आदिवासी
मंडळी नाचत आहे, त्यांच्या मागे आम्ही सर्च मधील लोक चाललो होतो आणि आमच्या
मागे आदिवसी स्त्रिया अतिशय गोड गोंडीगीत गात होत्या. ते वातावरणच
मंत्रमुग्ध करणारं होतं.
थोड्या
वेळातच, गावकर्यांनी केलेली मेहनत जिथे अरसीकासही प्रेमात पाडेल, ते
मैदान आलं. त्यासाठी पक्षांच्या प्रतिक्रुती काढलेली पुन्हा एक नवीन कमान होती.
रस्त्यावर काही काष्ठशिल्प रोवली होती, रस्त्यावर लग्नात अक्षदा टाकाव्या
पण अन्नाची नासाडी रोखाव्या अशा प्रकारे तान्दळाचा रंगात भिजवलेला कोंडा
आंथरलेला होता. रस्ता तीन रंगांच्या पट्ट्यामधे सारवलेला असल्यामुळे खुपच
उठून दिसत होता. हा सारवलेला मार्ग बांबूच्या एक दीड फुटाच्या कुम्पनाने
वेढलेला होता. एका बाजूस सर्व संघांचे झेंडे फडकत होते. नायना एका-एका
झेंड्यावरील संघाची नावे वाचत होते.
पुढे
चालून एक आगळावेगळा मंच आम्हास दिसला. सर्व गावकर्यांनी पहूण्यांसाठी ‘लई
भारी’ झोपडी बनवली होती. अम्मा-नायनांनातर हे सगळं खूप आवडतं आणि त्यात भर
म्हणजे नायनांच्या समोर बाम्बूपासून बनवलेली चरख्याची प्रतिकृती ठेवण्यात
आली होती.
तो
आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. नाजूकभाऊंनी (सर्चचे आदिवासी
भागातील आरोग्यदूत) पाहूण्यांचं स्वागत करण्यासाठी काही लोकांकर्वे
पुष्पगुच्छ देण्याचे सांगीतले. सर्व काही ‘लोकल’ असताना पुष्पगुच्छ कसे
अपवाद ठरतील...! बाम्बूच्या तुकड्यामधे सिंधीची फुले फसवली आणि तयार झालं मनमोहक पुष्पगुच्छ.
आदरसत्कार झाला आणि नंतर गावातील एका वरिष्ठ व्यक्तीस जंतूर नावाचे वाद्य वाजवण्यास सांगण्यात आले.
हे
वाद्य दिसण्यास फारच आगळंवगळं होतं. एक काडी, जीला घोड्याचे केस वर्पासून
खालपर्यंत एकतारीच्या तारेप्रमाणे बान्धले होते. ते वाजवण्यासाठी अजून एका
काडीला अगदी तशाच प्रकारे घोड्याचे केस लावले होते. एखादं व्हायोलीन वाजावं
तसं ते बाबाजी जंतूर वाजवू लागले. त्यांनी वाजवलेली धून ईतकी सुरेख होती
की पुर्ण परीसर मंत्रमुग्ध झाल्यासारखा वाटत होता. ते वाद्य आता उरलं नाही
हे ऐकून फार हळहळ झाली. नंतर अम्मा, नायना, हिरामनजी ह्यांनी आप-आपले मत
व्यक्त केले. त्यासाठी वापरण्यात आलेला माईकपण अगदीच वेगळा होता.
बाम्बूच्या सरळ जमीनीत रोवलेल्या काडीला एक छोटी तिरपी काडी लावलेली होती,
त्यामधे माईक ठेवण्यात आला होता. अप्रतीम!!!
नायना
आणि अम्मांनी सबंध आदिवासी लोकांच्या मेहनतीची आणि एकजुटीची भरभरून स्तूती
केली. हिरामनजी सुद्धा खूप छान बोलले. त्यांच्या बोलण्यातलं एक वाक्य जे
मला खूप आवडलं ते असं...
”भारत नावाच्या देशामधे दिल्ली नावाचं शहर आहे आणि तेथे सोनीया गांधी आणि मनमोहनसिंग राज्य करतात. त्यांच्या ठिकाणी असेच commonwealth नावाचे
खेळ ठेवलेले आहे. तिथे 5 रुपयाची वस्तू 500 रूपयाला लावण्यात आली, त्यांनी
आपल्याईथे येऊन शिकून जावे...” हे वाक्य मला बर्याच पैलूचे वाटले.
ह्यामधे सरकारवर आपलं लक्ष आहे हा भाव सुद्धा आहे, सरकार आपले नाही
असासुद्धा भाव दिसला, लोकशिक्षणाचा प्रयत्न दिसला, आदिवास्यांच्या
कतृत्वावर विश्वास पण दिसला.
त्यानंतर
नायनांच्या हस्ते प्रदर्शनीचं उद्घाटन झालं. ते प्रदर्शन हे आदिवासींच्या
संस्कृतीवर, गोपाल नावच्या कुरखेड्याच्या एका युवकाने काढलेली अनन्यशाधारण
चित्रे होती. ह्या चित्रांची विशेषता म्हणजे रंग म्हणून रंगीत कोंड्याचा
वापर करण्यात आला होता. ते एक एक चित्र उत्तम कलेचं जीवंत उदाहरण होतं..
चित्राबरोबरच प्रदर्शनात आदिवास्यांच्या दैनंदीनीतील काही अवजारे व साधने
होती.
त्यानंतर
सर्व जनता मैदानाला वेढा घालून उभी राहिली. पेटवलेली मशाल प्रत्येकाच्या
हातातून समोरच्याच्या हातात देण्यात आली. महादेवभाऊ आणि नाजूकभाऊ रेला
(आदिवसी गीत) म्हणण्यास लागले. अशा प्रकारे मशाल पुर्ण मैदानाच्या भोवती
फिरून आली. ततपश्चात नायनांनी मशालीने ज्योत पेटवली आणि खेळाचं औपचारीक
उद्घाटन पार पडलं.
उद्घाटनानंतर
थोडा चिवडा खाऊन आम्ही परतीच्या प्रवसाला निघालो. तिथे थांबण्यावची आमची
फारच ईच्छा होती पण आधीच एका ठिकाणी जवळ-जवळ 12 जणं राहत होती. त्यामूळे
निघणच योग्य होतं. परत येताना दिवसभरात पाहिलेले नवनवीन कलाविष्कार
डोळ्यासमोर येत होते. गाडीतला प्रत्येकजण सर्व कार्यक्रमाचं कौतुक करत
होते. काही वेळातच शोधग्राम आलं. आम्ही परत आलो पण मन मात्र एडसगोन्दीलाच
राहीलं.
(काही तांत्रीक अडचणींमुळे फोटोज अपलोड करणे जमले नाही...)