Wednesday, March 11, 2026

आऊटलायर्स

 मानवाची प्रत्येक पिढी म्हणे

काही महान व्यक्तींच्या खांद्यावर बसलेली असते.

खरंच आहे की...


आपल्याला असंख्य गोष्टी आपसुखच मिळाल्या

अन्न वस्त्र निवारा या गरजा आपल्या

इतिहासात विविध रुपात आल्या

आणि नंतर गरजा वाढत गेल्या

गरजा भागवण्यासाठी मग मानवाने ज्ञानाची निर्मिती केली

ज्ञाननिर्मिती ही पण गरज झाली मग…

गरजा वाढत राहणं ही पण कुणाचीतरी गरजच असेल ना

वाढोत गरजा… अमर्याद…

आपल्याला आपल्या महान पूर्वजांनी खांद्यावर बसवलंच आहे की

मग अजून पुढचं पाहीलं तर बिघडतं कुठे?

हेच तर प्राग्रेसिव्ह असणं आहे ना!


पण मग का माझ्या मनात घालमेल असते

वाटतं, विकासामधे बहुजनांचा विचार नाही

एका साच्यात न बसणाऱ्या

नॉर्मल नसणाऱ्या

माणसांचा विचार नाही

मग वाटतं, ही लोक नाहीत बसली का कुणाच्या खांद्यावर?

“अरे त्यांना सरकारने सगळं फुकट दिलंय.

कुबड्यांची सवय झालीये त्यांना”

हा युक्तीवाद सुरु होतो.

पण फुकट मिळण्याचं खातं सुरुवातीपासून पाहायला हवं ना….

मग कळेल कुणाची ठेव किती आहे ते, व्याज किती आहे ते

नको नको… त्यापेक्षा खांद्यावरून विकासाचं हरिण पाहू या…

मी पण मग खांद्यावर बसतो

पुढ पाहायला… 

तेव्हा चुकुन खाली नजर जाते

मला अंधारात चमकणारे शेकडो डोळे दिसतात