Tuesday, April 21, 2015

कलरब्लाईंड

मला तिची खूप आठवण येतीये...
खूपच जास्त
कालच तिच्या नसण्याचा
झाला दुःखद साक्षात्कार
ते सत्य – देव करो तो आभास असो
तो आभास
बोचतोय मला
इतका जास्त पीडतोय की
धमन्यातून रक्त वाहायचं थांबून जावं
आपलं अस्तित्व हवेत वीरघळून जावं

तिच्या कुशीत सदैव रमणारा मी
माझ्या गाण्यात शब्द फुंकणारी ती
वेळेलाही बधीर करणारे आम्ही
कुठे आहोत?

चित्रातून एक एक रंग विरून जावा
आणि उरावा फक्त कोरा कागद
असे का व्हावे?
रोमांचित करणार्‍या श्वासा-श्वासात
फक्त अनरोमॅन्टिक ऑक्सीजन उरावा?
ती हरवलीये का?
ती हरवलीये... का मी?

कुणी तिचा पत्ता सांगेल का?
कुणी माझा पत्ता सांगेल का?

ती कशी होती?
अं... ती....
ती होती सत्यप्रिय
ती होती भावनिक
ती होती सुंदर शांत
ती होती बोल्ड परखड
दु:खी विद्रोही अस्तित्ववादी
शुन्य भोळी रांगडी
काहीशी वेडी सामाजिक खाजगी
रंगीत सुवासिक तालबद्ध
ती होती जगद्व्यापी ओम्नीप्रेजेंट
मुख्य म्हणजे
ती होती!
ती सर्व काही होती
ती मी होती
आणि मीही होतो ती

खरंच ती  हरवली असेल का?
कदाचित ती नसेल हरवली
कदाचित मीही शाबूत असेन
चित्रातले रंग अजूनही तसेच असतील
मीच झालो असेल
कलरब्लाईंड !

कदाचित...