Saturday, November 23, 2013
शिक्षणप्रवास
[सीमोल्लंघन या ऑनलाईन मासिकातून...]
आपल्या आयुष्यभराच्या कामची दिशा ठरवताना अतुलला काय अनुभव आले, कुठे चूका झाल्या आणि त्यातून काय शिकायला मिळाले याबद्दल त्याच्याच शब्दात –
वाचकहो नमस्कार! तुमच्याशी थोडं बोलण्याची प्रेमळ ऑर्डर मला संपादकाकडून मिळाली व मी ती निमूटपणे मान्य केली. त्यातूनच हा लेख निघाला. तो तुमच्यासमोर मांडतो आहे.
१ ऑक्टोबर २०१३ पासून मी ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात क्वेस्ट (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) या संस्थेसोबत काम करण्यासाठी सुरुवात केली. क्वेस्ट ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण या विषयात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक व शासकीय यंत्रणा यांसोबत काम करते. संस्थेच्या विविध प्रकल्पांपैकी एक असलेल्या बालभवन या प्रकल्पाचे मी काम बघतो.
बालभवन हा प्राथमिक व माध्यमिक वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी चालणारा शाळाबाह्य कार्यक्रम आहे. वाडा तालुक्यात १० बालभवनांद्वारे ३ आश्रमशाळेतील व ७ जि.प. शाळेतील मुलांसोबत काम चालते. प्रत्येक बालभवनासाठी एक प्रशिक्षित बालमित्र असतो. १ ते ४ वर्गातील मुलांसाठी भाषा साक्षरता, गणित व विज्ञान यांविषयांवर विशीष्ट शैक्षणिक साहित्यांच्या मदतीने inputs दिले जातात तर ५ ते ७ वर्गातील भाषा व गणित विषयांत मागे असणाऱ्या मुलांसाठी remediation चा कार्यक्रम चालवला जातो.
शिक्षणशास्त्रात एखाद्या विद्यार्थ्याने दिलेला प्रश्न बरोबर सोडवला याला जेवढे महत्त्व आहे त्यापेक्षा थोडे अधिक महत्त्व 'ते सोडवताना त्याने काय रीत वापरली? त्याची चूक झाली असेल तर त्यामागे काय विचार होता? उत्तर बरोबर असेल तर त्याला ती संकल्पना नीट समजली आहे का?' अश्या (pedagogic)बारकाव्यांना आहे. म्हणूनच ‘या काम क्षेत्रात करण्याचा विचार ते प्रत्यक्ष काम सुरु करणे’ असा माझा एक शैक्षणिक प्रवास कसा झाला, आणि त्यातही, मी अमुक-अमुक ठिकाणी काम सुरु करण्याच्या निर्णयापर्यंत कसा जाऊन पोहोचलो? हे पाहणं देखील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरेल.
आपल्यापैकी काही जणांना वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या गोष्टी कराव्याश्या वाटतात. मला शिक्षणात काम करावंसं वाटणं हे त्यापैकीच आहे का? याचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. त्यासाठी मी जवळपास एक वर्ष घेतलं. एक वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे का? तर मला तो वाटत नाही. शिक्षण या माझ्यासाठी अगदीच नवख्या असलेल्या क्षेत्रासाठी तर नाहीच नाही. बऱ्याचदा 'शिकवणं म्हणजे काय कुणालाही जमेल अशी गोष्ट आहे आणि त्यातच बालशिक्षण तर काय सोप्पच आहे!' असा आपला समज आपल्याही नकळत झालेला असतो. मी करतो ती गोष्ट मला जमत नाहीये किंवा आवडत नाहीये त्यामुळे'शिक्षणात काम करणे' ही मी निवडलेली सोपी पळवाट तर नाही ना? हा विचार करणे फ़ार महत्त्वाचे होते.
माझ्यासाठी पुढे काय करावं? शिक्षणात काम करावं? हा गोंधळ नेहमीचाच झाला होता. पुढचा मार्ग निवडताना स्वभाव-स्वधर्म-युगधर्म याचा वापर करून गोंधळ दूर करुया म्हटलं तर तो अजूनच वाढायचा. त्याकाळात सर्चमध्ये लहानमुलांच्यासोबत पोषण या विषयावर सुरु असलेल्या एका अभ्यासात मी भाग घेतला. या अभ्यासादरम्यान मला माझा स्वभाव कळण्यात मदत झाली. पण ‘माझे मुलांशी सहज बनणारे नाते'ही एकच गोष्ट 'शिक्षणात काम करावे' हा मोठा निर्णय घेण्यासाठी पुरेशी आहे का? सर्वच पातळींवर माझा‘आपुलाची वाद आपणासी' सुरू होता.
मुलांची मानसिकता हा नवखा विषय वाचनातून माझ्या समोर आला आणि मला माझ्याबद्दलची नविनच गोष्ट कळाली. मी माझ्या शिक्षणादरम्यान शाळा नावाच्या प्रकाराला कायम दूर ठेवत आलो होतो. मला शाळेत ज्या पद्धतीने शिकवलं जात होतं ते आनंददायी तर नव्हतंच. याव्यतिरीक्त त्यात माझ्या शिकण्याच्या गतिचा अंतर्भावही नव्हता. त्यामूळे शाळेचा मला त्रास न होऊ देता मी स्वशिक्षणाची पद्धत नकळतपणे विकसीत केली होती. शिक्षणात बदल असावे व त्यासाठी आपण काहीतरी करावे या भावनेच्या मुळाशी कुठेतरी औपचारिक शिक्षणाचा हा माझा अनुभव नक्कीच आहे.
एकदा, मी सर्चमधे एका मुलीची गणिताच्या मुलभूत संकल्पनेवर मुलाखत घेतली. ही मुलाखत माझा कामाबाबत निर्धार होण्यासाठी tipping point ठरली. असरचा अहवाल वाचून शिक्षणाची दुरावस्था माहित होती. पण, साक्षात्कार होण्यासाठी प्रत्यक्ष दर्शनच व्हावं लागतं! विद्यार्थ्यावर शिक्षणातील सर्व प्रचलीत उणीवांमूळे होणारा अन्याय, विद्यार्थ्याची यासंबंधीची अनभिज्ञता आणि पर्यायाने बनलेली मानसिकता एका मुलीमुळे मला समजली.
To see a World in a grain of sand....गांधींनी सुचविलेला तलिस्मान मला तिच्यात मिळाला.
साधारणपणे पुढचा एक वर्ष शिक्षण विषयाशी नाळ जोडण्याचा मी थोडा-फ़ार प्रयत्न केला. स्वतःची व सोबतच घरच्यांची मनाची तयारी होणं या काळात झालं. काय करायचं? याची थोडीफ़ार कल्पना आली व मी सर्चमधील जबाबदारीतून मुक्त झालो. आपलंच घर सोडून जाताना खूप त्रास झाला! पण त्याला पर्याय नव्हता.
शिक्षणात काम करायचं तर आधीच या विषयात ज्यांनी काम केलं आहे त्यांना भेटणं व त्यांच्या संचिताचा आपल्या निर्णयप्रक्रियेत उपयोग करून घेणं हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. एखाद्या प्रायोगिक शाळेसोबत काम करावं की उपलब्ध शासकीय यंत्रणेच्या सोबत काम करावं, जालन्यात (माझ्या गावी) काम करावं की काम निवडण्यासाठी जागेचा निकष लावूच नये, पूर्ण वेळ काम करावं की अर्थर्जनाची दुसरी काही सोय करून उरलेल्या वेळात हे काम करावं अशा प्रत्येक प्रश्नावर विचार करताना चांगलाच कस निघाला. सोबतच मी काही चुका देखील केल्या आणि त्या देखील समजून घ्यायला हव्या.
मी जालन्यातील एका चांगल्या शाळेसोबत काम करण्याचं ठरवलं. सोबतच संध्याकाळी पॉलिटेक्निकच्या मुलांच्या ट्युशन्स घेणे असा महत्वकांक्षी विचार देखील केला. विशेष म्हणजे ट्युशन्स घेणे हे मला तत्वतः पटत नव्हते. तरीसुद्धा मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा प्रत्यक्ष काय काम करायचं? याचं नियोजन करण्याची वेळ आली तेव्हा कागदावर काहीच मांडता येईना. जालन्यात काम करण्यामागे काही वैयक्तिक कारणं तर होतीच पण त्यासोबतच आपण स्वतःच्या बळावर काम करू शकू आणि शिकवणं म्हणजे काय कॉमन सेन्सच आहे असा अव्यवहारिक समज देखील होता.
कुठल्याही कामासाठी काही कौशल्य लागतात आणि ती मिळवण्यासाठी साधनेला पर्याय नाही हे कुणीतरी कानाखाली खाडकन् चपराक देऊन सांगितल्यासारखं मला वाटलं. या सर्व अनुभवातूनच मी नायनांनी (डॉ. अभय बंग यांनी) सांगितल्याप्रमाणे Values, Goals, Rules, Roles आणि Personalities यांचा विचार करून शिक्षणात काम करणाऱ्या क्वेस्ट या संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.
ह्या पूर्ण प्रवासात घरच्यांचा सहभाग असणे हा कळीचा मुद्दा होता. जसा माझा शैक्षणिक प्रवास सुरु होता तसा त्यांचाही तो सुरु होताच आणि शिक्षणात प्रत्येकाला आप-आपल्या गतिने शिकण्याची मुभा असायलाच हवी. धीर न सुटू देता घरच्यांना वेळ दिला व योग्य ठिकाणी त्यांच्या अनुभवाचा वापर केला तर त्यांचंही गणित सुटतं नी आपलंही!
Wednesday, June 12, 2013
विश्वरूपदर्शन
प्रचंड
वेगाने त्याला ओढलं जातं,
नेलं
जातं सगळ्यांसोबत.
खरं
तर, त्यानंच
पूर्ण होशोआवाज मध्ये
केलं
असतं स्वाधीन
स्वतःला.
तशी,
त्याला सवय
नसते या जीवघेण्या गतीची...
"जमाने
के साथ चलना पडता है!"
वेळप्रसंगी
"दौडना
पडता है!!!”
सांगीतलं
जातं त्याला.
कधी
प्रवास सुरू होतो त्याचं
त्यालाच कळत नाही...
"ठंडी
कुल्फ़ी लो, गरमागरम
चाय लो...”
त्याच्या
घशाला कोरड पडते.
कांद्याचा
वास नाकात घुमतो,
भूक
लागते अचानक.
छान
खिडकी जवळ बसणारा तो,
कधीचा
बघत असतो,
आत;
क्षणोक्षणी
फ़ुटणार्या, ईच्छा
चाळवणार्या त्या अमर्याद
बुडबुड्यांकडे.
तेही,
पुर्ण 'होशोआवाज'
मध्ये!
खरं
तर त्याच्या जवळच
असतो,
जेवनाचा
डब्बा
आईने
अगदी प्रेमाने
पहाटे
लवकर उठून केलेला
आणि
त्याला पहायचं असतं
बाहेर.
अगदी दूरवर...
त्यासाठीच
तर खिशातला रुमाल टाकून
त्याने
ती जागा जिंकलेली असते.
तेवढ्यात
एक बुडबुडा फ़ुटतो,
मिरची
जाते डोळ्यात
आणि
बचावासाठी किंवा गार हवेसाठी
म्हणा हवं तर
तो
खिडकीचा वापर करतो.
तिकडे
डोंगराने कापसाची कॉलर घातलेली
असते;
रानात
बाभळीवर टीटवी
तिच्या
किंचळणार्या आवाजात
पावसाशी
मिन्नतवारी करित असते;
एक
कुटुंब बैलगाडीवर जात असतं,
त्यांच्याच
गतीनं;
कायम
कळपात राहणारं हरिण
आज
एकटंच असतं.
(बाकीचा
कळप संपला की काय?)
पण
खिडकीच्या चौकटीत या विश्वाचा
व्याप सामावणं कठीण.
कारण,
खिडकीची
गती जरा जास्तच असते.
या
वेगात असतो
अगदी
चिवट,
देवासारखा
चराचर व्यापून टाकणारा,
त्याच
फ़्रेम ऑफ़ रेफ़रन्स मधला
कांद्याचा
वास.
त्याने
'होशोआवाज'
मधे घेतलेला.
मग
अचानक,
एक
स्टेशन जवळ येतं.
वेग
मंदावतो...
खिडकीची
चौकट विस्तारते थोडी.
पडकी
विहीर दिसते,
नांगरली
जमिन दिसते,
चिंच
झुलावी तशी झोका घेणारी मुलगी
दिसते,
साचलेलं
पाणी दिसतं,
वाढलेली
गर्दी दिसते,
गांधी
टोपी अन् मर्राठवाडी फ़ेटा
दिसतो...
वेग
अजून मंदावतो.
एक
गरीब निर्वासीत पोर शुन्यात
बघत असतं...
(काय
विचार करत असेल ते?)
एका
खिडकीतून होणारं विश्वरूपदर्शन
त्याला
कायमचं जागं करत.
स्टेशन
येतं. गाडी
थांबते.
थोड्या
वेळात, शीळ
वाजते
पुऩ्हा
कांद्याचा वास घुमतो
(सवय
मोडायला नको ना...!)
पण,
आता खिडकीजवळ
तो नसतो
-
२७/५/१३
जालना
- नाशिक
रेल्वे प्रवास
Friday, June 7, 2013
रेल्वे
त्यादिवशी
रिजर्वेशन काढायचं नाही असं
मी ठरवलंच होतं. लगीनसराई
असली तरिही. यावेळेस
नेहमीच्या सवयीला थोडा आराम
द्यायचा होता. आपल्या
हक्काची जागा असणं, मग
गाडी सुरु व्हायच्या आधीच
तिच्यावर जाऊन बसणं, ये
जा करणारा प्रत्येक जण आपल्या
जागेवरच टपलेला आहे असं वाटणं,
आपली जागा
अजून कुणाला द्यावी लागू नये
म्हणून येत नसली तरिही,
झोपेचं नाटक
करणं आणि अंथरून न पाहताच पाय
पसरून देणं हे प्रत्येक
मध्यमवर्गिय भारतीयाला
संस्कारातच मिळालेलं असतं.
जागा नावाच्या
या गडाला जिंकायचे हे आपले
प्रयत्न जर शिवबांनी पाहिले
असते तर मावळ्यांच्या रिक्त
पदासाठी आपल्याला ऑफ़रलेटर
हमखास आलं असतं. या
खुर्चीच्या लढाईत आपण
रेल्वेप्रवासाची मजा,
जिवंतपणा
चुकवतो आहोत असं मला हल्ली
वाटू लागलं होतं. यावेळेस
मी एकटा होतो, प्रवासही
५ तासांचाच होता, मग
ठरलं. जाऊयात
विना आरक्षण!
मला जवळच्या मित्राच्या लग्नासाठी नाशिकला जायचं होतं. जालन्याहून नाशिकला जायचं म्हटल्यास सोपा मार्ग म्हणजे रेल्वेचा. कदाचित, प्रवास खर्चात तिपटीने होणारी बचत हा प्रवास अधिकच सोपा आणि सुकर करत असेल.
रेल्वे
उशीरा आल्यामुळे ठरलेल्या
वेळेच्या दोन तास उशीरा माझा
प्रवास सुरु झाला.
अपेक्षेप्रमाणे
खूप गर्दी होती. जालन्याहून
सुटणार्या सकाळच्या रेल्वेमधे
शिकण्यासाठी, कामासाठी,
खरेदीसाठी,
इतकंच काय
तर फ़क्त पिक्चर बघण्यासाठी
औरंगाबादला जाणार्यांची अमाप
गर्दी असते. या
गर्दीतले चेहरे माझ्या ओळखीचे
नव्हते पण गर्दी मात्र ओळखीची
होती.
या गर्दीतल्या युवकांचे साधारण तीन गट पडतात. पहिल्या गटात असतात शिस्तीत डब्ब्यात जागा पकडून बसणारे आणि जागा नाहीच मिळाली तर गाडीत एखाद्या मोकळ्या ठिकाणी उभे राहणारे युवक. तर दुसरा गट असतो
जागा
पकडून जणू काही आपण दानवीर
कर्ण आहोत हे दाखवण्यासाठी
ती दुसर्याला देऊन अख्ख्या
रेल्वेतून इकडून तिकडे फ़क्त
आणि फ़क्त मुली बघत फ़िरणार्या
आणि एखादी मुलगी आवडली तर ती
कोणत्या डब्ब्यात नेमकी कुठे
आहे हे आपल्यासारख्याच गरीब,
दरिद्री
गरजवंतांना सांगणार्या
मुलांचा. स्थानकावर
लवकर येऊनही दारात बसायला
किंवा उभं रहायला मिळावं
म्हणून प्लॅनिंग करून रेल्वेत
उशीरा शिरणारे, स्वतःला
खूप हुश्शार समजणारे तरुण
तिसर्या गटात मोडतात.
गाडी सुरु झाली आणि या तीनही गटाच्या मुलांनी आपआपली पात्रे रंगवायला सुरुवात केली. तीनही गटात लीलया संचार करणारे काही हुरहुन्नरी कलावंतही असतात या गर्दीत असतात. त्यांना एक विशेष मान असतो.
हे सगळं पाहताना मलाच नॉस्टॅलजीक वाटत होतं. मी तिसर्या गटासोबत दाराजवळ उभं राहून येणार्या गार हवेचा अस्वाद घेत होतो.
तासाभरात औरंगाबाद आलं आणि गाडी पानगळीच्या झाडासारखी झाली. निर्मनुष्य ! प्रत्येक डब्ब्यात बोटावर मोजण्याइतकेच लोक उरले. मग मनमाडपर्यंत प्रत्येक स्टेशनवर लोक चढत-उतरत होते; पण, गर्दी मात्र झाली नाही.
मनमाडवरून
नाशिकला दुसरी रेल्वे घ्यावी
लागली. या
गाडीत प्रचंड गर्दी!
माझ्यासाठी
अनोळखी अशी. मी
कसाबसा आत शिरलो आणि डब्ब्याचे
दार व संडास या मधील जागेत
थांबलो. कारण,
पुढे जाणं
शक्यच नव्हतं.
कुठल्याही रेल्वेच्या गर्दीत दोन डब्ब्यांच्या मधल्या जागेत एखादं कुटुंब, कुणी रस्त्यावरील विक्रेता त्याच्या सामानासकट, एखादा दैवी वाटणारा मुस्लीम वृद्ध, एखादा अपंग बसलेले आढळतात. प्रवास करताना नेहमीच या बसलेल्यांकडे उभं राहून बघताना दयेची, तुच्छतेची भावना मनाला शिवून जायची.
मी जिथे उभा होतो तिथेच एक कुटुंब दोन गाठोडे घेउन बसलेलं होतं. कदाचित उभ्या जगात त्यांचं म्हणावं असं तेवढंच सामान असेल. मी थोडा विचार केला आणि तिथेच दोन पायावर बसलो. त्या कुटुंबातल्या एका ७ वर्षाच्या मुलाच्या जागेवर मी बसलो होतो आणि त्यासाठी माझ्यावर कुणी खेकसलं नव्हतं. याउलट तो मुलगा माझ्याकडे पाहून गोड हसला होता.
मी बसलो होतो तिथून जग वेगळंच दिसत होतं. आता गर्दीत ये-जा करणारे लोक मला वाईट वाटू लागले होते. त्यातले बरेचसे रेल्वेमधील विक्रेते होते. एकीकडे मी त्या मुलाशी खेळत होतो आणि दुसरीकडे येणार्या जाणार्यांपासुन स्वतःच शरीर वाचवत होतो. एका माणसाचा पाय माझ्या पायाला लागला आणि मला एकदम घाण वाटायला लागलं. जणू काही माझं शरीर घाणीने बरबटलं आहे. अस्वस्थ होउन मी इकडे तिकडे बघू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या मुलाचे डोळे माझा कटाक्ष शोधत होते. त्या काजळ घातलेल्या डोळ्यांकडे आणि मग त्या मुलाकडे मी बघतच राहीलो. तो मुलगा रेल्वेच्या संडासच्या दाराला तोंड चिकटवून बसल्याचा मला दिसला.
लवकरच नाशिक आलं. दुसर्या दिवशी लग्न लागल्यानंतर मी परतीच्या प्रवासाला लागलो. पुऩ्हा रेल्वेतली गर्दी भेटली. पुऩ्हा मी दाराजवळ उभा राहीलो. मला खूप छान वाटत होतं. सगळ्या प्रवाश्यांसोबत एकरूप झाल्यासारखं!
दारात एक माणूस बसलेला मला दिसला. त्याच्या बाजूला जागा होती. कॉलेजमधे असताना आम्ही मित्र दारातच बसायचो. बराच वेळ उभं राहील्यानंतर मला दाराजवळ बसण्याची तीव्र ईच्छा झाली. कपड्यांची परवा न करता मी दारात बसणारच तेवढ्यात दुसरा एक जण तिथे येऊन बसला. झालं. तो व्यक्ती अगदी आपल्या जागेवर टपूनच होता हा भाव माझ्यात यायला लागला. थोड्या वेळापुर्वी माझ्याशी एकरूप झालेला, आता त्या जागेसाठी माझा प्रतिस्पर्धी झाला होता. माझ्यातला हा बदल मलाच जाणवला आणि आता जागा मिळाली तरी तिथे बसायचं नाही असं मी ठरवलं.
हळूहळू
पुऩ्हा एकरुपता आली.
पुढे एका स्टेशनावर मला खुर्चीवर जागा मिळाली. काही तासांत प्रवास संपला. वडिल मला घ्यायला स्टेशनवर आले होते. त्या गर्दीतून वेगळं होऊन मी त्यांच्यासोबत निघालो.
रस्त्यावर बेशिस्त, भयाण आणि किंचाळणार्या वाहनांची गर्दी होती पण माझं लक्ष दुसरीकडेच होतं. आता माझ्या शरीरातून धड्-धड् असा आवाज येऊ लागला होता. मी विचार करू लागलो, कशाचा असेल हा आवाज? रेल्वेचा की हृदयाच्या ठोक्यांचा....?
Subscribe to:
Posts (Atom)