Wednesday, June 12, 2013

विश्वरूपदर्शन


प्रचंड वेगाने त्याला ओढलं जातं,
नेलं जातं सगळ्यांसोबत.
खरं तर, त्यानंच पूर्ण होशोआवाज मध्ये
केलं असतं स्वाधीन
स्वतःला.
तशी, त्याला सवय नसते या जीवघेण्या गतीची...
"जमाने के साथ चलना पडता है!"
वेळप्रसंगी "दौडना पडता है!!!”
सांगीतलं जातं त्याला.

कधी प्रवास सुरू होतो त्याचं त्यालाच कळत नाही...

"ठंडी कुल्फ़ी लो, गरमागरम चाय लो...”
त्याच्या घशाला कोरड पडते.
कांद्याचा वास नाकात घुमतो,
भूक लागते अचानक.
छान खिडकी जवळ बसणारा तो,
कधीचा बघत असतो,
आत;
क्षणोक्षणी फ़ुटणार्या, ईच्छा चाळवणार्या त्या अमर्याद बुडबुड्यांकडे.
तेही, पुर्ण 'होशोआवाज' मध्ये!

खरं तर त्याच्या जवळच
असतो, जेवनाचा डब्बा
आईने अगदी प्रेमाने
पहाटे लवकर उठून केलेला
आणि त्याला पहायचं असतं
बाहेर. अगदी दूरवर...
त्यासाठीच तर खिशातला रुमाल टाकून
त्याने ती जागा जिंकलेली असते.

तेवढ्यात एक बुडबुडा फ़ुटतो,
मिरची जाते डोळ्यात
आणि बचावासाठी किंवा गार हवेसाठी म्हणा हवं तर
तो खिडकीचा वापर करतो.

तिकडे डोंगराने कापसाची कॉलर घातलेली असते;
रानात बाभळीवर टीटवी
तिच्या किंचळणार्या आवाजात
पावसाशी मिन्नतवारी करित असते;
एक कुटुंब बैलगाडीवर जात असतं,
त्यांच्याच गतीनं;
कायम कळपात राहणारं हरिण
आज एकटंच असतं.
(बाकीचा कळप संपला की काय?)

पण खिडकीच्या चौकटीत या विश्वाचा व्याप सामावणं कठीण.
कारण,
खिडकीची गती जरा जास्तच असते.
या वेगात असतो
अगदी चिवट,
देवासारखा चराचर व्यापून टाकणारा,
त्याच फ़्रेम ऑफ़ रेफ़रन्स मधला
कांद्याचा वास.
त्याने 'होशोआवाज' मधे घेतलेला.

मग अचानक,
एक स्टेशन जवळ येतं.
वेग मंदावतो...
खिडकीची चौकट विस्तारते थोडी.

पडकी विहीर दिसते,
नांगरली जमिन दिसते,
चिंच झुलावी तशी झोका घेणारी मुलगी दिसते,
साचलेलं पाणी दिसतं,
वाढलेली गर्दी दिसते,
गांधी टोपी अन् मर्राठवाडी फ़ेटा दिसतो...
वेग अजून मंदावतो.
एक गरीब निर्वासीत पोर शुन्यात बघत असतं...
(काय विचार करत असेल ते?)

एका खिडकीतून होणारं विश्वरूपदर्शन
त्याला कायमचं जागं करत.
स्टेशन येतं. गाडी थांबते.

थोड्या वेळात, शीळ वाजते
पुऩ्हा कांद्याचा वास घुमतो
(सवय मोडायला नको ना...!)

पण, आता खिडकीजवळ तो नसतो

-
२७//१३
जालना - नाशिक रेल्वे प्रवास

No comments:

Post a Comment