Friday, June 7, 2013

रेल्वे


त्यादिवशी रिजर्वेशन काढायचं नाही असं मी ठरवलंच होतं. लगीनसराई असली तरिही. यावेळेस नेहमीच्या सवयीला थोडा आराम द्यायचा होता. आपल्या हक्काची जागा असणं, मग गाडी सुरु व्हायच्या आधीच तिच्यावर जाऊन बसणं, ये जा करणारा प्रत्येक जण आपल्या जागेवरच टपलेला आहे असं वाटणं, आपली जागा अजून कुणाला द्यावी लागू नये म्हणून येत नसली तरिही, झोपेचं नाटक करणं आणि अंथरून न पाहताच पाय पसरून देणं हे प्रत्येक मध्यमवर्गिय भारतीयाला संस्कारातच मिळालेलं असतं. जागा नावाच्या या गडाला जिंकायचे हे आपले प्रयत्न जर शिवबांनी पाहिले असते तर मावळ्यांच्या रिक्त पदासाठी आपल्याला ऑफ़रलेटर हमखास आलं असतं. या खुर्चीच्या लढाईत आपण रेल्वेप्रवासाची मजा, जिवंतपणा चुकवतो आहोत असं मला हल्ली वाटू लागलं होतं. यावेळेस मी एकटा होतो, प्रवासही ५ तासांचाच होता, मग ठरलं. जाऊयात विना आरक्षण!

मला जवळच्या मित्राच्या लग्नासाठी नाशिकला जायचं होतं. जालन्याहून नाशिकला जायचं म्हटल्यास सोपा मार्ग म्हणजे रेल्वेचा. कदाचित, प्रवास खर्चात तिपटीने होणारी बचत हा प्रवास अधिकच सोपा आणि सुकर करत असेल.
रेल्वे उशीरा आल्यामुळे ठरलेल्या वेळेच्या दोन तास उशीरा माझा प्रवास सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे खूप गर्दी होती. जालन्याहून सुटणार्या सकाळच्या रेल्वेमधे शिकण्यासाठी, कामासाठी, खरेदीसाठी, इतकंच काय तर फ़क्त पिक्चर बघण्यासाठी औरंगाबादला जाणार्यांची अमाप गर्दी असते. या गर्दीतले चेहरे माझ्या ओळखीचे नव्हते पण गर्दी मात्र ओळखीची होती.

या गर्दीतल्या युवकांचे साधारण तीन गट पडतात. पहिल्या गटात असतात शिस्तीत डब्ब्यात जागा पकडून बसणारे आणि जागा नाहीच मिळाली तर गाडीत एखाद्या मोकळ्या ठिकाणी उभे राहणारे युवक. तर दुसरा गट असतो
जागा पकडून जणू काही आपण दानवीर कर्ण आहोत हे दाखवण्यासाठी ती दुसर्याला देऊन अख्ख्या रेल्वेतून इकडून तिकडे फ़क्त आणि फ़क्त मुली बघत फ़िरणार्या आणि एखादी मुलगी आवडली तर ती कोणत्या डब्ब्यात नेमकी कुठे आहे हे आपल्यासारख्याच गरीब, दरिद्री गरजवंतांना सांगणार्या मुलांचा. स्थानकावर लवकर येऊनही दारात बसायला किंवा उभं रहायला मिळावं म्हणून प्लॅनिंग करून रेल्वेत उशीरा शिरणारे, स्वतःला खूप हुश्शार समजणारे तरुण तिसर्या गटात मोडतात.

गाडी सुरु झाली आणि या तीनही गटाच्या मुलांनी आपआपली पात्रे रंगवायला सुरुवात केली. तीनही गटात लीलया संचार करणारे काही हुरहुन्नरी कलावंतही असतात या गर्दीत असतात. त्यांना एक विशेष मान असतो.

हे सगळं पाहताना मलाच नॉस्टॅलजीक वाटत होतं. मी तिसर्या गटासोबत दाराजवळ उभं राहून येणार्या गार हवेचा अस्वाद घेत होतो.

तासाभरात औरंगाबाद आलं आणि गाडी पानगळीच्या झाडासारखी झाली. निर्मनुष्य ! प्रत्येक डब्ब्यात बोटावर मोजण्याइतकेच लोक उरले. मग मनमाडपर्यंत प्रत्येक स्टेशनवर लोक चढत-उतरत होते; पण, गर्दी मात्र झाली नाही.
मनमाडवरून नाशिकला दुसरी रेल्वे घ्यावी लागली. या गाडीत प्रचंड गर्दी! माझ्यासाठी अनोळखी अशी. मी कसाबसा आत शिरलो आणि डब्ब्याचे दार व संडास या मधील जागेत थांबलो. कारण, पुढे जाणं शक्यच नव्हतं.

कुठल्याही रेल्वेच्या गर्दीत दोन डब्ब्यांच्या मधल्या जागेत एखादं कुटुंब, कुणी रस्त्यावरील विक्रेता त्याच्या सामानासकट, एखादा दैवी वाटणारा मुस्लीम वृद्ध, एखादा अपंग बसलेले आढळतात. प्रवास करताना नेहमीच या बसलेल्यांकडे उभं राहून बघताना दयेची, तुच्छतेची भावना मनाला शिवून जायची.

मी जिथे उभा होतो तिथेच एक कुटुंब दोन गाठोडे घेउन बसलेलं होतं. कदाचित उभ्या जगात त्यांचं म्हणावं असं तेवढंच सामान असेल. मी थोडा विचार केला आणि तिथेच दोन पायावर बसलो. त्या कुटुंबातल्या एका ७ वर्षाच्या मुलाच्या जागेवर मी बसलो होतो आणि त्यासाठी माझ्यावर कुणी खेकसलं नव्हतं. याउलट तो मुलगा माझ्याकडे पाहून गोड हसला होता.

मी बसलो होतो तिथून जग वेगळंच दिसत होतं. आता गर्दीत ये-जा करणारे लोक मला वाईट वाटू लागले होते. त्यातले बरेचसे रेल्वेमधील विक्रेते होते. एकीकडे मी त्या मुलाशी खेळत होतो आणि दुसरीकडे येणार्या जाणार्यांपासुन स्वतःच शरीर वाचवत होतो. एका माणसाचा पाय माझ्या पायाला लागला आणि मला एकदम घाण वाटायला लागलं. जणू काही माझं शरीर घाणीने बरबटलं आहे. अस्वस्थ होउन मी इकडे तिकडे बघू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या मुलाचे डोळे माझा कटाक्ष शोधत होते. त्या काजळ घातलेल्या डोळ्यांकडे आणि मग त्या मुलाकडे मी बघतच राहीलो. तो मुलगा रेल्वेच्या संडासच्या दाराला तोंड चिकटवून बसल्याचा मला दिसला.

लवकरच नाशिक आलं. दुसर्या दिवशी लग्न लागल्यानंतर मी परतीच्या प्रवासाला लागलो. पुऩ्हा रेल्वेतली गर्दी भेटली. पुऩ्हा मी दाराजवळ उभा राहीलो. मला खूप छान वाटत होतं. सगळ्या प्रवाश्यांसोबत एकरूप झाल्यासारखं!

दारात एक माणूस बसलेला मला दिसला. त्याच्या बाजूला जागा होती. कॉलेजमधे असताना आम्ही मित्र दारातच बसायचो. बराच वेळ उभं राहील्यानंतर मला दाराजवळ बसण्याची तीव्र ईच्छा झाली. कपड्यांची परवा न करता मी दारात बसणारच तेवढ्यात दुसरा एक जण तिथे येऊन बसला. झालं. तो व्यक्ती अगदी आपल्या जागेवर टपूनच होता हा भाव माझ्यात यायला लागला. थोड्या वेळापुर्वी माझ्याशी एकरूप झालेला, आता त्या जागेसाठी माझा प्रतिस्पर्धी झाला होता. माझ्यातला हा बदल मलाच जाणवला आणि आता जागा मिळाली तरी तिथे बसायचं नाही असं मी ठरवलं.
हळूहळू पुऩ्हा एकरुपता आली.

पुढे एका स्टेशनावर मला खुर्चीवर जागा मिळाली. काही तासांत प्रवास संपला. वडिल मला घ्यायला स्टेशनवर आले होते. त्या गर्दीतून वेगळं होऊन मी त्यांच्यासोबत निघालो.

रस्त्यावर बेशिस्त, भयाण आणि किंचाळणार्या वाहनांची गर्दी होती पण माझं लक्ष दुसरीकडेच होतं. आता माझ्या शरीरातून धड्-धड् असा आवाज येऊ लागला होता. मी विचार करू लागलो, कशाचा असेल हा आवाज? रेल्वेचा की हृदयाच्या ठोक्यांचा....?

2 comments:

  1. खूपच छान गुरु... (असे शब्द खर तर न्याय करत नाहीत अस मला वाटत) पण खूप आवडला हा लेख.. उत्तरोत्तर जास्तच भारी वाटत गेला, पकड घेत गेला. शेवट तर खूपच अप्रतीम... :) लिहित जा बे नेहमी.

    ReplyDelete