Wednesday, November 30, 2011

ध्यान

परिचयाची वाट मजला
अनोळखीशी वाटली
आरपार जी होती राने
गर्द हिरवी जाहली

काय जादू येथ झाली
बदल हा झाला कसा?
एक सर आली अचानक
सोडवाया पेच हा

करूनी घंटानाद गाई
धाव घेती लगबगे
तोच सर उद्दाम होता
मोह त्यांना पांघरे

रानतळीच्या पायवाटा
चकाकती पाण्यासवे
पाखरांच्या गायकीला
ताल देती पर्जने

धूळ बनूनी माखलेले
पाने हिरवी जाहली
रानफुलांना नव्याने
लाली लेवू लागली

घेऊनी अंगावरी ती
आल्हाद पर्जन्य – फुले
वाटे जसे मी आणि तो
बोलतो जरी शब्द उणे
(सुरुवात-जुलै, समाप्त-29/11/2011)

No comments:

Post a Comment